अॅप डेव्हलपर्सचं काम कसं चालतं?  

 ऑन द जॉब भन्नाट कामं करणार्‍या माणसांच्या जगात एक सहल


एक दिवस व्हॉट्सअॅप बंद पडलं तर डोक्याला कल्हई होते. जीव तगमगतो. मित्रांकडचे कुठकुठले अॅप पाहून लगेच ते अॅप डाउनलोडला लावले जातात. आपल्याकडे ‘लयभारी’ अॅप्स आहेत, अशी फुशारकीही मारली जाते!
पण डोक्यात येतो का कीडा की, हे असे भारी अॅप्स कुणाच्या सुपीक डोक्यातून येत असतील? कोण बनवत असेल हे अॅप्स?
हाच प्रश्न पडला आणि शोधू लागलो अॅप डेव्हलपरला! त्याच शोधात भेटला, अमेय बापट. त्याला म्हटलं येऊ का, तुझ्या ऑफिसमध्ये? कसं काय करता तुम्ही काम, जरा सांग ना!
म्हणून मग त्याचं ऑफिस गाठलं.
सोर्स कोड कंपनी असं त्याच्या फर्मचं नाव. अॅप डेव्हलप करून देणार्‍या अनेक कंपन्या असतात, काही छोट्या, काही बड्या. त्यातलीच ही एक.  इतर कंपन्या, संस्था यांना गरजेप्रमाणं ते अॅप बनवून देतात. ते अॅप जे बनवतात ते अॅप डेव्हलपर. अमेय हा त्यातलाच एक अॅप डेव्हलपर. अमेय आणि त्याच्या सहकारी अॅप डेव्हलपरला भेटायला गेलो आणि लक्षात आलं अॅप डाउनलोड करण्याइतकं सोपं नाही ते बनवणं!  अॅप तयार करताना अॅप डेव्हलपरची तांत्रिक टीमच काम करत नाही, तर मेंदूचा भुगा पडेस्तोवर डोकं लावून, आयडिया करकरून मग फायनली अॅप तयार करण्याचं काम सुरू होतं.
अमेयच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत जाऊन बसलो आणि अमेयला विचारलं त्याच्या कामाविषयी तर तो म्हणाला, ‘पहिला टप्पा हाच असतो की, अॅप बनवून दे असं सांगणार्‍याला आमच्याकडून नक्की काय हवंय हे समजून घ्यायचं. आम्ही बनवलेलं अॅप नक्की कोण वापरणार आहे, नेमकी कोणती माणसं कशासाठी ते वापरतील हे नीट समजून घ्यावं लागतं. ते समजून घेणं हे अवघड काम. आणि मुख्य मुद्दा म्हणजे किती दिवसात ते अॅप बनवून द्यायचं आहे, पैसा किती खर्च होणार आहे  अॅपची निर्मिती किती दिवसात करायची आहे, हे सारं समजून घ्यावं लागतं. ज्यांना अॅप बनवून हवं त्यांच्याशी ८-१0 दिवस रोज चर्चा करावी लागते. जे ठरेल, ते लिहून काढावं लागतं. करार करून घ्यावा लागतो. त्यालाच  डॉक्युमेंटेशन म्हणतात.’
नॉर्मल अॅपच्या निर्मितीसाठी एक ते दोन महिने लागतात, काही भन्नाट, जास्त कपॅसिटीच्या अॅपला तीन-चार महिनेही लागू शकतात. एक अॅप एकच माणूस बनवत नाही तर अॅप डेव्हलपर्सच्या टिममधे प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी दिलेली असते.
- हे असं सारं मी समजून घेत होतो, सोबत होतेच अमेय आणि त्याचे सहकारी अॅप डेव्हलपर्स. मस्त चकाचक कार्पोरेट ऑफिस. त्या ऑफिसात छोट्या छोट्या अनेक डिस्कशन रूम्स होत्या. आणि अॅप बनवायचं कसं याविषयी जोरदार डिस्कशन या रूममध्ये होत होते. सिनियर डेव्हलपर बाकीच्यांना गोष्टी समजावून सांगत होता. समोर लॅपटॉप, काही गोष्टी त्यावर दाखवत होता. एकदम कूल, यंग आणि चिअरफूल वातावरण.
अनेकांची मतं, अनेकांचे दृष्टिकोन त्यातून साकारणारी एक भन्नाट गोष्ट. अमेय सांगतो, दिवसाला किमान आठ तास तर काम ठरलेलं. पण एखादा अॅप अर्जंट तयार करून द्यायचा असेल तर दिवसातले १४-१६ तास आम्ही काम करतो. बाकी सगळ्या गोष्टी बंद. अगदी कुणाचा फोन आला तरी तो मी घेऊ शकत नाही, बाकी काही टाइमपासचा तर विषयच सोडा!’  
चहा पीत पीत, कॉफीच्या ऑर्डरी सोडत (आणि काहीजण सिगारेटचे कश मारून येत) एका जागीच बसून तासन्तास काम करतात.  अर्थात अमेय ना चहा-कॉफी पितो, ना सिगारेट ओढतो. पण बैठक लावून काम करायला बसला की, तो गरम पाणी नाहीतर ग्रीन टी पितो. स्वत:ला फ्रेश ठेवण्याचे असे अनेक फंडे जो तो शोधून काढतोच.
अॅप ‘डेव्हलप’ कसं होतं हे शोधून काढताना भेटलेले हे यंग डेव्हलपर्स मुलंमुली म्हणजे उत्साहाचे झरे ! स्वत:चं पर्सनल लाईफ विसरून, तासन्तास काम करत, सतत स्वत:च्या डोक्याला ताप देऊन एक उत्तम अॅप जेव्हा ते तयार करतात, तेव्हा त्यांचा आनंद प्रत्येक वेळेस नव्याकोर्‍या अॅप इतकाच नवाकोरा असतो.


-राहुल कला

अॅप डेव्हलपर्सचं काम कसं चालतं?

* एकच माणूस एकच अॅप तयार करतो असं काही होत नाही.
* एक अॅप हा एक प्रोजेक्ट असतो, त्यावर विविध डेव्हलपर्स काम करतात. प्रत्येकाची जशी क्षमता, नॉलेज तसं कामाचं वाटप होतं.
* कुणी ‘अॅप’ नेमकं कसं तयार करायचं, हे ग्राहकाकडून समजावून घेतो. करारमदार करतो.
* कुणी अॅपची मुख्य आखणी करतो.
* अॅप तयार करण्याअगोदर त्यासाठीचे विविध स्क्रिन तयार करावे लागतात. तसे स्क्रीन काहीजण तयार करतात.
*काही अॅप मोबाइलवर सुरू होतात, पण टॅबलेटमध्ये सुरू  होत नाहीत. त्यामुळे आपला अॅप नक्की कशावर चालेल की दोन्हीवर चालेल, याचा विचार करून त्याचं स्ट्रक्चर बनवावं लागतो, काहीजण ते काम करतात.
* अॅप तयार करताना अनेक छोट्याछोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. टाइम लिमिट असतं, वेळा सांभाळणं महत्त्वाचं त्यामुळे दर आठवड्याला कामाच्या प्रगतीचा रिव्ह्यूू करावा लागतो. आपण अॅप निर्माण करण्याच्या कोणत्या टप्प्यात आहोत, आणखी किती दिवस त्यासाठी लागणार आहेत, याचा आढावा घ्यावा लागतो. काहीजण ते काम पाहतात.
* ज्या दिवशी अॅप लॉन्च केला जाणार आहे त्याच्या किमान ८ दिवस अगोदर तो तयार झालेला असावा लागतो. या आठ दिवसात त्याचे टेस्टिंग केले जाते. काहीजण ते टेस्टिंगचं काम करतात.
* फर्म जितकी मोठी त्याप्रमाणे अॅप डेव्हलपर्सची, सिनियर अॅप डेव्हलपरची संख्या कमी जास्त होते. एकावेळेस अनेक अॅप डेव्हलप करण्याचं काम सुरू  असतं.
Previous
Next Post »